Ad will apear here
Next
बेंगळुरूमधील उद्याने आणि बरेच काही...
लालबाग उद्यान (फोटो : विकिपीडिया)

बेंगळुरू हे प्रामुख्याने उद्यानांचे आणि तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच येथे अनेक संग्रहालयेसुद्धा आहेत. ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण बेंगळुरूचा संक्षिप्त इतिहास, तसेच तेथील काही ठिकाणांबद्दल पाहिले. आजच्या भागात पाहू या येथील उद्याने, संग्रहालये आणि अन्य काही ठिकाणांबद्दल... 
..........
जुने वृक्ष

लालबाग :
हा भारतातील सुंदर बगीच्यांपैकी एक आहे. १८व्या शतकात हैदर अली याने याची निर्मिती केली आणि टिपू सुलतानाने त्याचा अधिक विस्तार केला. दीड चौरस किलोमीटर क्षेत्र असलेला सुंदर तलावही येथे आहे. अफगाणिस्तान आणि फ्रान्समधून आणलेल्या दुर्मीळ प्रजातींच्या वनस्पती हे बागेचे वैशिष्ट्य. त्यातील सुंदर, लाल गुलाबामुळे उद्यानाचे नाव लालबाग असे ठेवले गेले आहे. येथे एक काचघर असून, तेथे पुष्प प्रदर्शन भरविले जाते. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन या दिवशी बगीचा सुशोभित केला जातो. २४० एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेल्या या उद्यानात उष्णकटिबंधीय वनस्पतींचा मोठा संग्रह असून, येथे एक हजाराहून अधिक प्रजाती आढळतात. 

कमलपुष्प तलाव

या बागेची शोभा वाढविणारे एक ठिकाण म्हणजे कमलपुष्प तलाव. वनस्पती संरक्षणाबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दर वर्षी फुलांचे प्रदर्शन आयोजित केले जाते. दररोज सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत बगीचा खुला असतो. १८५६मध्ये हा बगीचा अधिकृत बोटॅनिकल गार्डन म्हणून घोषित करण्यात आला. लंडनच्या क्रिस्टल पॅलेसप्रमाणे बागेच्या आत एक ग्लास पॅलेस बनविण्यात आले आहे. लालबाग येथील खडक सुमारे तीन लाख वर्षांपूर्वीचा असून, तो पृथ्वीवरील सर्वांत जुन्या खडकांपैकी मानला जातो. 

अल्सूर लेक

अल्सूर लेक :
१२३ एकरावर असलेला हा बेंगळुरूमधील मोठा तलाव आहे आणि त्यात अनेक छोटी बेटे आहेत. याला हलसुरू तलाव असेही म्हणतात. शहराच्या पूर्वेकडे असलेला हा तलाव केम्पेगौडाच्या काळात बांधला गेला; पण त्याचे नूतनीकरण तत्कालीन कमिशनर लुई बेंथॅम बॉवरिंग यांनी केले. 

कब्बन पार्क : हे उद्यान ३०० एकरावर विस्तारलेले असून, बेंगळुरूच्या हृदयस्थानी आहे. १८७०मध्ये मेजर जनरल रिचर्ड सॅंकी यांनी १०० एकर जागेवर हे उद्यान उभे केले. या सार्वजनिक उद्यानाचे नाव प्रथम ‘मीड्स पार्क’ असे ठेवले गेले. त्या वेळचे कमिशनर सर मार्क कब्बन (क्यूबॉन) यांचे नाव नंतर उद्यानाला दिले गेले. १९२७मध्ये श्री कृष्णराज वाडियार यांच्या राजवटीचा रजत महोत्सव साजरा करताना उद्यानाचे नाव बदलून, श्री चामराजेंद्र वाडियार (१८६८ ते १८९४) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामराजेंद्र पार्क असे नाव देण्यात आले. हिरवाईने नटलेल्या या उद्यानात अनेक प्रकारच्या वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. हिरव्यागार लॉन्समधील पदपथावरून फिरताना सुखद अनुभव मिळतो. या उद्यानात वनस्पतींच्या स्वदेशी आणि विदेशी अशा सुमारे ६८ प्रजाती आणि ९६ गुणधर्म असलेल्या सुमारे सहा हजार वनस्पती आहेत. पार्कमध्ये आर्टोकार्पस, बहावा, फायकस, अरोकेरिया, बांबू, टॅबुबिया अशी अनेक विदेशी प्रजातीची झाडे आहेत. ऑस्ट्रेलियातून आणलेली सिल्व्हर ओक आणि गुलमोहर ही झाडे येथेच प्रथम लावली गेली. 

रात्रीच्या वेळचा इस्कॉन मंदिराचा देखावा

इस्कॉन मंदिर :
बेंगळुरूतील सुंदर संकुलांपैकी हे एक संकुल आहे. या संकुलात अनेक प्रगत गोष्टी आहेत. यामध्ये मल्टि-सिनेमा थिएटर, संगणक साह्याने सादरीकरण होणारे थिएटर आणि वैदिक ग्रंथालयातील उपदेशात्मक लायब्ररी यांचा समावेश आहे. या मंदिराच्या सदस्यांना राहण्यासाठी येथे उत्तम सुविधादेखील आहे. इस्कॉन मंदिर मुख्य पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले आहे. हे मंदिर पारंपरिक आणि आधुनिक आर्किटेक्चरच्या दाक्षिणात्य शैलीत बांधले आहे. भक्तांसाठी सर्व सुविधादेखील उपलब्ध आहेत. इस्कॉन मंदिरच्या प्रांगणात सहा मंदिरे आहेत. राधा आणि कृष्णाचे मुख्य मंदिर, चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद, व्यंकटेश्वर, प्रल्हाद-नरसिंह, श्रीला प्रभुपाद आणि कृष्ण ब्रह्म ही ती मंदिरे होत. उत्तर बेंगळुरूमधील राजाजीनगरमध्ये जगातील सर्वांत मोठे इस्कॉन मंदिर आहे. 

विश्वेश्वरय्या संग्रहालय

विश्वेश्वरय्या औद्योगिक व तांत्रिक संग्रहालय :
कस्तुरबा रोडवरील या संग्रहालयाला सर एम. विश्वेश्वरय्या यांचे नाव देण्यात आले आहे. येथे अनेक विषयांची वेगवेगळी दालने बघण्यास मिळतात. कब्बन पार्कमध्ये ४३ हजार चौरस फूट क्षेत्रावर इमारत बांधण्यात आली. १४ जुलै १९६९ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्याचे उद्घाटन केले. 

इंजिन हॉल

येथील दालने अशी – 

इंजिन हॉल :
उद्योगात वापरल्या जाणाऱ्या विविध कारची इंजिन्स, जेट विमान इंजिन आणि इतर यांत्रिक डिव्हाइसेसचे प्रदर्शन.

हाउसिंग्ज वर्क गॅलरी : इंटरॅक्टिव्ह प्रदर्शनांद्वारे मशीन्सच्या मूलभूत तत्त्वांची व्याख्या करण्याचा प्रयत्न आहे. येथे खेचण्याची यंत्रणा, गियर, गतिमान स्थानांतर करण्याचे विविध मार्ग, लीव्हर्स, झुबकेदार विमान आदींचा समावेश आहे. दुसरा भाग रोजच्या जीवनात या साध्या मशीन्सच्या वापराशी संबंधित आहे. 

मजेदार विज्ञान गॅलरी : ध्वनी, प्रकाशीय, द्रव, गणित आणि धारणा यांच्या विज्ञानावर आधारित प्रदर्शन 

इलेक्ट्रो-टेक्निक गॅलरी : वीज, इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण यावर आधारित प्रदर्शन. या गॅलरीमध्ये ऑरस्टेडचे प्रयोग, बारलोचे व्हील, आणि फारडे यांच्या रिंगसारख्या शास्त्रीय प्रयोगांचा समावेश आहे. 

दी स्पेस : येथे भारतीय अवकाश कार्यक्रमाचे प्रदर्शन आहे. गॅलरीची निर्मिती भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने केली आहे. अवकाश तंत्रज्ञानाला वाहिलेली भारतातील ही पहिली विज्ञान गॅलरी आहे. 

बायोटेक्नॉलॉजिकल रिव्होल्युशन गॅलरी : जैवतंत्रज्ञानातील मूलभूत गोष्टींवर आणि त्याच्या प्रयोगांवर आधारित असलेली ही गॅलरी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बीईएल) सहकार्याने २९ जून २००४ रोजी याचे उद्घाटन झाले. ही गॅलरी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मूलभूत तत्त्वांवर मार्गदर्शन करते. 

मुलांसाठी विज्ञान गॅलरी : येथे मुलांसाठी विविध विज्ञानविषयक प्रयोग आहेत. येथे एक प्रचंड पियानो आहे, त्याचे वादन करण्यासाठी मुले त्यावर नाचू शकतात. डायनासोर ऑलिव्ह गॅलरी प्रदर्शनात स्पिनोसॉरसची हलती प्रतिकृती आहे. ही प्रतिकृती डोके, हात आणि शेपूट हलवू शकते.

राइट ब्रदर्स गॅलरी : येथे राइट ब्रदर्सच्या फ्लायरचे एकास एक प्रमाणाचे मॉडेल, आणि फ्लाइट सिम्युलेटर आहे.

टिपू समर पॅलेस

टिपू समर पॅलेस :
हे बेंगळुरूमधील ऐतिहासिक व प्रेक्षणीय ठिकाण म्हणून ओळखले जाते. हा किल्ला त्याच्या काळाच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. या पॅलेसमध्ये टिपू सुलतानाचे ग्रीष्मकालीन वास्तव्य असायचे. इंडो-इस्लामिक आर्किटेक्चरचे हे उदाहरण आहे. हैदरअली याने या महालाच्या बांधकामाची सुरुवात केली व टिपू सुलतानाने तो १७९१मध्ये पूर्ण केला. महालाच्या समोर कर्नाटक सरकारच्या बागकाम विभागाने एक बाग आणि लॉन केले आहे. चौथ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात टिपू सुलतानाचा मृत्यू झाल्यानंतर ब्रिटिश प्रशासनाने या इमारतीचा वापर सचिवालयसाठी केला. तेथे असलेले टिपूचे सिंहासन तोडून त्यांनी ते विकून टाकले. तळमजल्यावर आता संग्रहालय करण्यात आले आहे. 

जवाहरलाल नेहरू प्लॅनेटरियम : बेंगळुरूमधील टी. चौधिया रोड येथे हे प्लॅनेटरियम आहे. ते १९८९मध्ये कार्यान्वित झाले. येथील तारांगण घुमट ५० फूट व्यासाचा आहे. तेथे २२५ प्रेक्षक बसू शकतात. दररोज दोन शो दाखवले जातात. मुलांना, तसेच पर्यटकांना तारांगणाचे दर्शन घडविले जाते. तसेच आकाशाची सुंदर माहिती दृकश्राव्य पद्धतीने दिली जाते. हे ठिकाण आवर्जून पाहण्यासारखे आहे. दुपारी तीन आणि चार वाजता कार्यक्रम दाखविले जातात. 

विशाल शिवमूर्तीगवी गंगाधरेश्वर मंदिर : हे मंदिर बसवानागुडीजवळ वसलेले आहे. हे मंदिर विशेषतः त्याच्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. बेंगळुरूच्या जुन्या मंदिरांपैकी हे एक आहे. ते केम्पेगौडा यांनी १६व्या शतकात, पाच वर्षांच्या तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर बांधले होते. हे मंदिर भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. या मंदिरात एक नैसर्गिक गुहा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भक्त येथे एकत्र होतात. 

विशाल शिवमूर्ती : ६५ फूट उंचीची विशाल शिवमूर्ती हे बेंगळुरूचे आकर्षण आहे. मुरुगेशपाल मॉलच्या मागे ही पद्मासनातील मूर्ती असून, कैलासातून वाहणाऱ्या गंगा नदीचा सुंदर देखावा उभा करण्यात आला आहे. मूर्तीसमोर छोटा तलावही करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी ही मूर्ती खूप छान दिसते. 

गांधी भवन : महात्मा गांधींच्या जीवनाची आठवण करून देणारी ही इमारत कुमार गोरपा मार्गावर आहे. या इमारतीत गांधीजींच्या बालपणाच्या काळापासून, त्यांच्या आयुष्यातील अंतिम दिवसापर्यंतचे क्षण चित्रांद्वारे सादर करण्यात आले आहेत. याशिवाय गांधीजींनी स्वत: लिहिलेल्या पत्रांची प्रतिकृती, त्यांच्या वापरातील मातीची भांडी आणि पिण्याच्या पाण्यासाठीची भांडी इत्यादी वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत. 

फिल्मसिटी :
हे बेंगळुरूचे लोकप्रिय मनोरंजन पार्क आहे. कार्टून सिटी येथे विविध आकर्षणे आहेत. येथे वॉटर पार्कही आहे. अभिनव स्टुडिओमध्ये डिनो पार्क, प्रेतबाधित हवेली, मिरर भुलभुलैया आहे. तसेच साहसी खेळ आहेत. 

फिल्मसिटी

दर्गा : दरगाह हजरत तवक्कल मस्तान हा सुफी संतांचा बेंगळुरूमधील सर्वांत जुना दर्गा बेंगळुरूमध्ये आहे. 

चौदिया मेमोरियल हॉल : हा हॉल व्हायोलिनच्या स्वरूपात बांधला गेला आहे. कर्नाटकचे प्रसिद्ध सारंगी आचार्य टी. चौदिया यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा हॉल बांधण्यात आला. हा वातानुकूलित हॉल अनेक पारंपरिक कार्यक्रमांसाठी वापरला जातो.

बेंगळुरूच्या आसपास :
बाणेरघट्टा वन्यजीव अभयारण्य : १९७०मध्ये बेंगळुरूजवळ बाणेरघट्टा वन्यजीव अभयारण्य स्थापन करण्यात आले. १९७४मध्ये ते राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. या पार्कचा एक भाग बायोलॉजिकल पार्क म्हणून घोषित करण्यात आला आहे. आपण या अभयारण्यात बंद पिंजऱ्याच्या गाडीतून प्रवेश करतो. बाहेर वाघ-सिंहांचे राज्य असते. या पार्कमध्ये अजगर, किंग कोब्रा, बंगाली वाघ, आशियाई सिंह, बिबटे, गवे, साळिंदर, फुलपाखरे असे नानाविध प्राणी बघण्यास मिळतात. येथे मत्स्यालयही आहे. हे ठिकाण बेंगळुरूपासून २५ किलोमीटरवर आहे.

नागेश्वर मंदिर : बेंगळुरूजवळील बेगूर या जुन्या गावामध्ये बेंगळुरूपासून १३ किलोमीटरवर नागेश्वर मंदिर आहे. हे मंदिर गंगा राजवटीत बांधले गेले. बेगुरला वेपपूर असे संबोधले गेले होते, असे शिलालेखावरून दिसते. हा शिलालेख इ. स. ५८०मधील आहे.

चन्नपटना : हस्तशिल्प, खेळणी, चंदनी लाकडाची शिल्पे यासाठी प्रसिद्ध असलेले हे बेंगळुरू-म्हैसूर मार्गावरील एक ठिकाण आहे. उत्पादनांमध्ये चमकदार रंगीत लाकडी खेळणी, दरवाजे, पडदे, पावडर बॉक्स, नॅपकिन, रिंग्स, ज्वेलरी यांचा समावेश आहे. 

देवेनहल्ली किल्ला : हा किल्ला १५०१मध्ये अवती वंशाच्या मल्लबाईरगौडा यांनी बांधला. देवनाडोडी येथील देवप्पाच्या संमतीने हा किल्ला तयार झाला. किल्ला १७४७पर्यंत अवती शासकांच्या ताब्यात राहिला. काही काळ मराठा अंमल होता. परंतु हैदर अलीने त्यावर कब्जा केला. टिपू सुलतानाच्या पाडावानंतर कॉर्नवॉलिसने किल्ल्यावर कब्जा केला. 

रामदेवारा बेटा : ‘शोले’ या प्रसिद्ध चित्रपटाचे शूटिंग येथे केले गेले. रामगिरी पर्वत हे रामनगर शहराजवळील एक खडकाळ टेकडीचे ठिकाण आहे. 

सावनदुर्ग

सावनदुर्ग :
हा आशियातील मोठा मोनोलिथिक पर्वत समजला जातो. ट्रेकिंगसाठी हे उत्कृष्ट ठिकाण समजले जाते. १८८१मध्ये कर्नल ब्रॅनवेल यांनी येथे उत्खनन केले होते. त्या वेळी एका माणसाचा सांगाडा येथे सापडला होता. त्याच्या कपाळावर जखमेची खूण होती. हे स्थळ बेंगळुरूपासून ५० किलोमीटरवर आहे. 

- माधव विद्वांस
ई-मेल :
 vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.) 
लालबागेतील काचघर

काचघराचे रात्रीच्या वेळचे दृश्य

लालबागेतील तलाव

लालबाग पुष्पप्रदर्शन
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZTXBU
Similar Posts
वैविध्यपूर्ण आणि सुंदर शहर – बेंगळुरू बेंगळुरू या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली, उद्योगांचे शहर, तलावांचे शहर, शिक्षणसंस्थांचे शहर अशा अनेक ओळखी आहेत. म्हणूनच ते पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात माहिती घेऊ या बेंगळुरूची...
ऐतिहासिक, पौराणिक वारसा असलेला चित्रदुर्ग ‘करू या देशाटन’ सदरात आपण सध्या कर्नाटक राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेत आहोत. आजच्या भागात माहिती घेऊ या ऐतिहासिक, पौराणिक वारसा असलेले चित्रदुर्ग शहर आणि किल्ल्याची, तसेच आजूबाजूच्या पर्यटनस्थळांची...
निसर्गरम्य कोडागू आणि मडिकेरी धुक्याची ओढणी घेऊन हिरवा शालू पांघरलेली सह्याद्रीची गिरिशिखरे, फेसाळणारे धबधबे, हरतऱ्हेच्या पक्ष्यांची किलबिल, मुक्तपणाने फिरणारी १६ प्रकारची विविध जंगली श्वापदे, हवापालटासाठी ‘मडिकेरी’सारखे गिरिस्थान... हे वर्णन आहे कर्नाटकच्या कोडागू जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे... कूर्ग हेही याच जिल्ह्याचे नाव. ‘करू
सफर म्हैसूरची – भाग तीन ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण कर्नाटकमधील म्हैसूर शहरातील राजवैभव व तसेच वृंदावन उद्यानाची माहिती घेतली. या भागात पाहू या पुरातन, ऐतिहासिक संदर्भ असलेली मंदिरे आणि त्यातील शिल्पे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language